घडीभर तू थांब जरा’ या गीताने उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या, पालकांनी घेतला रस्सीखेच तसेच संगीत खुर्ची खेळण्याचा आनंद
श्रीगोंदा प्रतिनिधि: तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित नागवडे स्कूलमध्ये फादर्स डे अर्थात ‘पितृ दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विष्णू गायकवाड यांनी भूषविले. कार्यक्रमासाठी सेंट्रल बँकेचे शाखा व्यवस्थापक सागर गोडसे, ज्येष्ठ मानसतज्ञ विजयकुमार कारळे, नगरसेवक समीर बोरा, तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे निरीक्षक एस पी गोलांडे, सोनिया गांधी पॉलिटेक्निकचे प्राचार्य अमोल नागवडे उपस्थित होते.
प्रसंगी स्पृहा काळेवाघ आणि सिद्धी लिमकर या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. तसेच प्रा.विक्रम शिंदे, रुपेश इथापे, समीर बोरा, प्रकाश कापसे या पालकांनी मनोगत व्यक्त करत फादर्स डे चा स्तुत्य उपक्रम साजरा करत असल्याबद्दल शालेय प्रशासनाचे कौतुक केले.
प्रसंगी विद्यार्थिनींनी गायलेल्या ‘घडीभर तू थांब जरा’ या गीताने उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या तर ‘आय लव यू डॅडी’ या गीतावर सादर केलेल्या नृत्याने मुले आणि वडिलांच्या नात्यातील भावनिकता अधोरेखित केली. यावेळी पालकांसाठी रस्सीखेच तसेच संगीत-खुर्ची या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व पालकांनी उत्स्फूर्तपणे खेळामध्ये सहभाग घेऊन आनंद घेतला. आपल्या वडिलांना खेळताना पाहून सर्व विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापिका नीतू दुलानी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया खेतमाळीस, आकांक्षा रोडे, अर्पिता शिंदे यांनी तर जयेश आनंदकर यांनी आभार मानले.




