
नैसर्गिक शेतीचा संदेश आणि हरित क्रांतीचे स्मरण.
सोपान सासवडे
जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी अहिल्यानगर.
7 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता, कृषी चिकित्सालय, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे “शाश्वत शेती दिन” मोठ्या उत्साहात व शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा प्रकल्प, आणि राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात व उद्दिष्ट
या दिनाच्या निमित्ताने शाश्वत, विषमुक्त व नैसर्गिक शेतीच्या प्रचार-प्रसारासाठी माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांना रसायनमुक्त शेती, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे, रेसिड्यू फ्री शेती, सेंद्रिय प्रामाणिकीकरण आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास प्रकल्प संचालक आत्मा श्री. प्रदीप लाटे, प्रकल्प उपसंचालक श्री. राजाराम गायकवाड, कृषी उपसंचालक श्री. सागर गायकवाड, कृषी विस्तार अधिकारी श्री. निलेश देरंगे, कृषी पर्यवेक्षक श्री. विजय सोमवंशी, सहाय्यक कृषी अधिकारी श्री. रावसाहेब नवले, श्री. राजेंद्र कर्डिले, तसेच सहाय्यक तंत्र व्यवस्थापक श्री. उमेश डोईफोडे व श्री. कांत जावळे यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात रोमिफ संस्थेचे श्री. प्रशांत नाईकवाडी यांनी डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे हरितक्रांतीतील योगदान विषद केले. तसेच विषमुक्त शेती करताना कोणती खते वापरावीत, जिवाणूंचा वापर कसा करावा, आणि सेंद्रिय प्रामाणिकीकरण कसे करावे यावर सखोल मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांनीही त्यांना विचारलेले प्रश्न मोकळेपणाने मांडले आणि चर्चेत भाग घेतला.
नेप्ती, पिंपळगाव उज्जैनी आणि पोखर्डी या गावांमधील शेतकरी सदस्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विजय सोमवंशी यांनी केले.
कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शाश्वत शेतीच्या दिशेने उचललेले हे पाऊल शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत व्यक्त केले.
