नवा कोरा कोट

काय सांगू नामा तुले
माह्या मनातली गोठ
गड्या खुटिलेच राह्यला
टांगेल नवा कोरा कोट !!
बेजा कुटाने करून
भरवून लय शाळा
निवडून आलो गळ्या
पाह्य तीन चार वेळा !!
ऐन चिऱ्यावर मारून
मले देल्ली गळ्या चोट
गड्या खुटिलेच राह्यला
टांगेल नवा कोरा कोट !!
महिनाभरा पासून
नांव होतं चर्चेमंदी
लाल दिव्याच्या गाडीत
बशीन मी मंत्रीपदी !!
शपथविधी दिवसी
श्रेष्ठी मनी आली खोट
गड्या खुटिलेच राह्यला
टांगेल नवा कोरा कोट !!
कशी ओढली कपाई
देवा भाग्याची लकीर
मुर्गा करे मेहनत
अंडा खाये रे फकीर !!
पत्त कट केलं त्याच
ज्यानं भेटून देल्ले वोट
गड्या खुटिलेच राह्यला
टांगेल नवा कोरा कोट !!
आपल्या लोकशाहीत
मित्रा असच चालते
अरे आंधळं दयते
अन कुत्रं पिठं खाते !!
चिल्लर करे विचार
अन गोठ करे नोट
गड्या खुटिलेच राह्यला
टांगेल नवा कोरा कोट !!
धोकेबाज लोकायचं
गड्या असच असते
गोडं गोडं बोलुनिया
केसानं गया कापते !!
कुनाले होतंय खुशी
कुणाचं दुखतं पोटं
गड्या खुटिलेच राह्यला
टांगेल नवा कोरा कोट !!
माह्या नवा कोरा कोटं !!
✍️वासुदेव महादेवराव खोपडे
सहा. पोलीस उपनिरीक्षक(सेनि)
अकोला 9923488556.
