सिंधुदुर्ग प्रतिनिधी: संजय भोसले.

तळेरे येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाच्या सभागृहात भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात भारतीय संविधानाच्या उद्दिशिकेचे वाचन कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी तळेरे गावातील नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाची सुरुवात वाचनालयाचे अध्यक्ष राजू वळंजू यांच्या हस्ते भारतीय संविधानाला पुष्प अर्पण करून करण्यात आले. यावेळी सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष सुरेश तळेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत तळेकर, वाचनालयाचे सचिव मिनेश तळेकर, सदस्य प्रा. हेमंत महाडिक, सौ. श्रावणी मदभावे, ग्रंथपाल सौ. साक्षी तळेकर, संज्योत नांदलस्कर, सौ. पटेल, शुभम सुनिल तळेकर आदी उपस्थित होते. शासनाच्या परिपत्रकानुसार भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठ नागरिक आणि तरुण पिढी यांच्याकडून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून घेतले जात आहे. त्यामुळे वाचनालयाच्या वतीने हा विशेष कार्यक्रम हाती घेतला होता. यावेळी सुरुवातीला दळवी विद्यालयाचे प्रा. नरेश शेट्ये यांनी प्रास्ताविक करून भारतीय संविधानाबाबत थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर दळवी महाविद्यालयाच्या दीक्षा हरयाण या विद्यार्थिनीने संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. शेवटी आभार मिनेश तळेकर यांनी मानले.
