
सिंधुदुर्ग प्रतिनिधी ; संजय भोसले.
कासार्डे विकास मंडळ, मुंबईचे संस्थेचे माजी अध्यक्ष कै.परशुराम माईणकर हे कासार्डे गावचे भूषण होते.अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेले कै.परशुराम माईणकर यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडून शैक्षणिक व सामाजिक सेवा केली. कासार्डे गावातील एक सज्जन,शांत,संयमी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती .नम्र,आणि अभ्यासू व्यक्तिमत्व असलेला मार्गदर्शक कार्यकर्ता हरपला असे भावपूर्ण उद्गार कासार्डे विकास मंडळ, मुंबईचे सहसचिव आनंद कासार्डेकर यांनी कासार्डे विद्यालयात आयोजित शोक सभेत काढले.
कासार्डे गावचे सुपुत्र व कासार्डे विकास मंडळ,मुंबईचे माजी अध्यक्ष कै.परशुराम माईणकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित शोक सभेत ते बोलत होते.
याप्रसंगी स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे,जि.प.सदस्य संजय देसाई,प.स.सदस्य प्रकाश पारकर, कासार्डे गावचे पोलीस पाटील महेंद्र देवरुखकर,विद्यालयाच्या प्राचार्या बी.बी.बिसुरे,पर्यवेक्षक एस.व्ही.राणे,
पालक प्रतिनिधी समीर सावंत इतर मान्यवर उपस्थित होते.
शोक सभेची प्रस्तावना स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे यांनी करताना कासार्डेमधील वाडी- वाडीतील नळ योजना,प्राथमिक आरोग्य केंद्रांत ड्रामा केअर सेंटरसाठी कै.परशुराम माईणकर यांचे मोठे योगदान असल्याचे सांगत लवकरच ते पुर्णत्वासही येईल असे सांगत त्यांच्या कार्याच्या अनेक आठवणींना उजाळा त्यांनी दिला.
याप्रसंगी जि.प.सदस्य संजय देसाई, प.स सदस्य प्रकाश पारकर,प्राचार्या बी.बी.बिसुरे, पर्यवेक्षक एस.व्ही.राणे यांनी तर शिक्षकाच्यांवतीने पी.जे.काळे यांनीही कै.परशुराम माईणकर यांच्या कार्यावर प्रकाश झोत टाकत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
या शोक सभेला कासार्डे गावातील सर्व पोलीस पाटील,ग्रा.प.सदस्य,संस्था पदाधिकारी,माजी विद्यार्थी व कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
