
जागतिक दिव्यांग समता सप्ताह कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रतिपादन
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: संजय भोसले
सामान्य विद्यार्थ्यांसोबतच दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम शासनाच्या मार्गदर्शनानुसार येथील अधिकारी आणि शाळेचे व्यवस्थापन करत आहेत. त्यातून दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविण्याचे आणि त्यांना योग्य सन्मान देण्याचे काम अत्यंत प्रभावीपणे होत आहे. यासाठी सर्वांचे खूप कौतुक असल्याचे प्रतिपादन गोवा येथील सामाजिक कार्यकर्ते अमेलिया वैद्य यांनी केले.
तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या डॉ. एम. डी. देसाई सांस्कृतिक भवनात आयोजित केलेल्या समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जागतिक दिव्यांग समता सप्ताह कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होत्या. या सप्ताहाचे उद्घाटन अमेलिया वैद्य यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कणकवली गट शिक्षणाधिकारी किशोर गवस, तळेरे उपसरपंच रिया चव्हाण, तालुका समन्वयक विशेष तज्ञ भाऊसाहेब कापसे, विषय तज्ञ प्रज्ञा दळवी, प्रणाली पाळेकर, केंद्रप्रमुख सदगुरू कुबल, तळेरे विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश मांजरेकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेरेचे मुख्याध्यापक महेंद्र पावसकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी 30 दिव्यांग विद्यार्थी आणि 20 पालक उपस्थित होते.
विशेष सत्कार
कणकवली पंचायत समितीच्या समग्र शिक्षा अभियान मधील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कामातील सातत्य, दिव्यांग मुलांप्रती असलेली आत्मीयता आणि सहकार्य वृत्तीमुळे तळेरे विद्यालयाच्यावतीने तालुका समन्वयक विशेष तज्ञ भाऊसाहेब कापसे, विषय तज्ञ प्रज्ञा दळवी, प्रणाली पाळेकर, विशेष शिक्षक सचिन सप्रे, कमलेश कामतेकर, नितेश तेली या सर्वांना मुख्याध्यापक अविनाश मांजरेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
शासनासह इतर लाभ प्राधान्याने दिले : किशोर गवस
शासनाकडून मिळणारे लाभ तालुक्यातील जवळपास सर्वच दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी या विभागाचे सर्व कर्मचारी कटाक्षाने आणि सामाजिक जाणीवा जागृत ठेऊन काम करत आहेत. शिवाय इतरांकडूनही मिळणाऱ्या योजनांचा लाभही या मुलांना प्राधान्याने देऊन त्यांना सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे जास्तीत जास्त शिक्षण प्रवाहात आणण्याचे महत्त्वाचे काम केले जात आहे. तसेच, पालकांनी अशा मुलांमधील गुण हेरून त्यांना तशी संधी उपलब्ध करून दिली पाहिजे, असे पालकांना सूचित केले.
दिव्यांग विद्यार्थी – शिक्षकांची कला सादर
या कार्यक्रमा दरम्यान तळेरे विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक अजित गोसावी, माजी विद्यार्थी साई खटावकर आणि विद्यामंदिर प्रशाला कणकवली ची उर्मिला होळकर यांनी अभंग गायन व वादन कला सादर केली. यावेळी अलेमिया वैद्य यांनी सर्व मुलांना भेटवस्तू देऊन गौरविले.
यावेळी प्रज्ञा दळवी, रिया चव्हाण, भाऊसाहेब कापसे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश मांजरेकर, सूत्रसंचालन सचिन शेट्ये यांनी तर आभार सुचिता सुर्वे यांनी मानले. दुपारच्या सत्रात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
