ईकास

म्हने गावाचा खेड्याचा
झाला ईकास ईकास
गांव पीपयाचा पारं
झाला भकास भकास !!
गावठाण गायरान
लोप पावल पावल
माह्या गावाचं गो-धनं
हाती कसाया गावलं !!
नाही आंगणात सडा
शेणा मातीचं लिपण
नाही रांगोळी दारात
घरं वाटे सुनसून !!
झूरते रे मनं माह्य
लागलिया हुरहूर
नाही पाह्यटेची ओवी
जात्याची रे घरघर !!
नाही भूपाळीचा सुर
नाही टाळ किणकीण
कुठं मंदिरी येईना
गोडं मृदूंगाची धून !!
तुका नाम्याचे अभंग
नाही काकड आरती
ईकासात हारपली
गांव गाड्याची संस्कृती !!
दुभंगल गांव माह्य
वाटे उदास उदास
पक्ष, जातीचा, धर्माचा
झाला ईकास ईकास !!
✍️वासुदेव महादेवराव खोपडे
सहा. पोलीस उपनिरीक्षक(सेनि)
अकोला 9923488556.
