
विजयकुमार गायकवाड
तालुका प्रतिनिधी
करमाळा: सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीचे बिगुल वाजण्याची शक्यता असून एवढ्या एक दोन दिवसात मतदार यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या या कारखान्यावर गेले तीन वर्ष प्रशासक नेमले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर होऊ घातलेल्या पहिल्याच निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे . विधानसभा निवडणुकीत येथील राजकीय समीकरणे बदलले असून विद्यमान आमदार नारायण पाटील यांना माजी आमदार जयवंतराव जगतापांनी साथ दिल्याने आजिनाथ कारखान्याची निवडणूकही हे दोन्ही नेते एकत्र येऊन लढण्याचे निश्चित आहे तर विरोधी पॅनल मधून माजी आमदार संजय मामा शिंदे व माजी मंत्री स्वर्गीय दिगंबर बागल यांच्या कन्या रश्मी बागल एकत्र येण्याची शक्यता बोलली जात आहे. तर विधानसभा निवडणूक लढवलेले प्रा. रामदास झोळ यांची भूमिका ही या निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे. आदिनाथ कारखान्याच्या या निवडणुकीत तालुक्यातील पश्चिम भागातील पोमलवाडी ऊस उत्पादक गटातून विद्यमान आमदार नारायण पाटील यांच्या गटातून अनेक नवे जुने चेहरे व निष्ठावंत कार्यकर्ते इच्छुक आहेत. त्यामध्ये कोंढार चिंचोली येथील सुरेश शिवाजी साळुंखे, हे विद्यमान आमदार नारायण पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून प्रमुख दावेदार आहेत. सुरेश साळुंखे हे गेले 30 वर्षे सक्रिय राजकारणात असून 1995 पासून शिवसेना शाखाप्रमुखांपासून पोमलवाडी जिल्हा परिषद शिवसेना उप गटप्रमुख गावातील विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य त्याचप्रमाणे गावचे प्रथम नागरिक म्हणून सरपंचपद भूषवले आहे. विद्यमान आमदार नारायण पाटील यांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. नारायण पाटील यांच्या विधानसभेच्या ४पैकी ३ निवडणुकीत त्यांनी निष्ठेने सक्रिय प्रचार केला आहे. साळुंखे हे कोंढार चिंचोली येथील प्रगतशील बागायतदार असून ते शेतीमध्ये वेळोवेळी आधुनिक प्रयोग करतात. सुरेश साळुंखे यांच्याबरोबर पोमलवाडी गटातून आमदार नारायण पाटील गटातून कात्रजचे किरण कवडे, केतुरचे संतोष खाटमोडे, वाशिंबेचे नितीन जगदाळे, खातगावचे रवींद्र कोकरे, टाकळीचे आजिनाथ लांळगे, कोंढार चिंचोलीचे राजेंद्र साळुंखे, इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. या गटातून सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष गुळवे व मा.जि.प. सदस्या सविता वहिनी राजेभोसले यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
