
सत्कार सोहळ्याने भारावले विद्यार्थी व पालक.
श्रीगोंदा प्रतिनिधि :- केंद्रीय माध्यमिक शिक्षण (CBSE) मंडळाने तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच इयत्ता १० वी चा निकाल घोषित केला.यामध्ये शहरातील अग्रगण्य शैक्षणिक संकुल म्हणून नावाजलेल्या तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित “शिवाजीराव नागवडे डॅफोडील्स स्कूल” तसेच “कौशल्यादेवी नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल” च्या विद्यार्थ्यांनी निकालामध्ये तालुक्यात बाजी मारत घवघवीत यश संपादन केले.
यानिमित्ताने आयोजित सत्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थान संस्थेचे विश्वस्त दिग्विजय नागवडे यांनी भूषविले.वेदांती नागवडे (CBSE) हिने ९५.८० गुणांसह केंद्रासह तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या एकूण ४४ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ३२ विद्यार्थ्यांनी ८० % पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.
शिवाजीराव नागवडे डॅफोडील्स स्कूलमध्ये वेदांती नागवडे, सत्यजित झणझणे, श्रावणी जगताप, विशाल बोळगे, तेजस्विनी काळे या अनुक्रमे प्रथम पाच विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना याबरोबरच कौशल्यादेवी नागवडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये चिन्मय ससाने, रुद्राक्ष वाबळे, सृष्टी घोडके, युवराज लोखंडे, तन्मय पाथरे या अनुक्रमे प्रथम पाच विद्यार्थी व पालकांचे सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
या स्तुत्य सत्कार सोहळ्याने विद्यार्थी, पालक भारावून गेले. विद्यार्थी तसेच पालकांनी यावेळी मनोगत व्यक्त करत विद्यालयाचे आभार व्यक्त केले.प्रसंगी इयत्ता १० वी च्या सर्व शिक्षकांचा देखील पालकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना दिग्विजय नागवडे यांनी स्वर्गीय शिवाजीराव बापू नागवडे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या इंग्लिश मीडियम संकुलातील विद्यार्थी मिळवित असलेल्या घवघवीत यशाबद्दल कौतुक करीत संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र दादा व अनुराधाताई नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था यशस्वी वाटचाल करत असल्याचे अधोरेखित करीत विविध नवनवीन उपक्रम राबविणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे निरीक्षक एस पी गोलांडे, सोनिया गांधी पॉलिटेक्निकचे प्राचार्य अमोल नागवडे, जगताप साहेब उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नीतू दुलानी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेश आनंदकर यांनी तर प्रास्ताविक प्रा.राहुल भांडवलकर यांनी केले.
